गेवराई तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतकऱ्याने ऊस कारखान्याकडे जात नसल्याने उसाला आग लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार (दि.११) दुपारी १२ च्या सुमारास घडली. नामदेव आसाराम जाधव ( वय ३२, रा. हिंगणगाव, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नामदेव जाधव यांच्याकडे ३ एकर जमीन आहे. त्यापैकी १ एकरमध्ये उसाचे पीक आहे. ऊस तोडणीला आला असताना ऊस कारखान्याला जात नाही, या नैराश्यातून त्यांनी आधी उसाला आग लावली. त्यानंतर त्याठिकाणीच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव यांनी बँकेचे व खासगी कर्ज घेतल्याचे सांगितले जात आहे. गेवराई पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
गेवराई तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचा ऊस आजही शिवारात उभा आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना झोप येईना. कारखाना ऊस घेऊन जाईल का नाही ? हा प्रश्न सतत शेतकऱ्यांना भेडसावत असतो. या कारणाने अनेक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.