ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर मध्ये मूसळधार पाउस
कोल्हापूर शहरात गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाची तब्बल वीस तास संततधार सुरू होती. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने काहीशी उसंत घेतली. या 20 तासांत शहरात 56 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी 36.77 मि.मी. पाऊस झाला. पावसाने पंचगंगेच्या पातळीतही वाढ झाली. मे महिन्यात जिल्ह्यात प्रथमच सलग पाऊस आणि नदी पातळीत वाढ झाली आहे.
शहरात तीन ठिकाणी झाडे पडली. त्यामध्ये एका चारचाकीचे नुकसान झाले. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला. तासभर धुवाँधार सरी बरसल्या. त्यानंतर जोर कमी झाला. यामुळे तास – दोन तासांत पाऊस थांबेल असे वाटत होते. मात्र पावसाने थांबण्याचे नावच घेतले नाही. सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळतच राहिला. पावसाची संततधार आज दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू होती. यामुळे पावसाळ्यासारखी स्थिती ऐन मे महिन्यात झाली होती
आजही सकाळपासून पाऊस सुरूच होता. यामुळे छत्र्या, रेनकोट आदी घेऊनच लोक घराबाहेर पडत होते. सलग कोसळणाऱ्या पावसाने छत्री, रेनकोट खरेदीसाठीही शुक्रवारी दुकानांत गर्दी झाल्याचे चित्र होते. पावसामुळे बाजारपेठा, दुकाने, भाजी मंडई आदी ठिकाणी तुलनेने आज गर्दी कमी होती. शासकीय कार्यालयांतही तशीच काहीशी परिस्थिती होती. सकाळपासून पावसाचा जोर कमी-जास्त होत होता. मात्र, पाऊस थांबत नव्हता. दुपारी अडीचच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. यानंतर काही काळ पाऊस पूर्ण थांबला. त्यानंतर तुरळक सरी अधूनमधून पडत होत्या. दिवसभर पावसाने वातावरणातील गारठा वाढला होता.





