नातवाला मारहाण केली म्हणून बापाने मुलीवर विळ्याने हल्ला केल्याचा प्रकार पेठ (ता. वाळवा) येथे शनिवारी सकाळी घडला. या हल्ल्यात लक्ष्मी रवींद्र कदम (वय 32, रा. निनाईनगर, इस्लामपूर सध्या रा. पेठ) या गंभीर जखमी झाल्या. हल्ल्याप्रकरणी वडील अरुण अण्णा पवार (वय 68, रा. पेठ) यांच्या विरोधात लक्ष्मी यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, लक्ष्मी या माहेरी पेठ येथे रहायला होत्या. शनिवारी सकाळी लक्ष्मी यांचा मुलगा प्रणव हा चहा पाहिजे म्हणून रडत होता. प्रणव याला लक्ष्मी यांनी मारहाण केली. त्यावेळी वडील अरुण याने ‘तू आमच्या घरात कोणाला मारायचे नाही’, असे लक्ष्मी यांना बजावले.
त्यानंतर दोघांमध्ये वादावादी झाली. ‘प्रणव हा माझा मुलगा आहे, मी त्याला मारेन किंवा भीती दाखवेन तुम्हाला काय करायचे’, असे लक्ष्मी या अरुण याला म्हणाल्या. यावेळी अरुण याने शिवीगाळ करून लक्ष्मी यांच्या डोक्यात विळा मारला. लक्ष्मी या गंभीर जखमी झाल्या. हल्ल्यानंतर अरुण याने पलायन केले.






