अल्पावधीत भारतीय तरुणाईला वेड लावणारे TikTok ऍप (TikTok Trend) आणि BGMI गेम लवकरच भारतात परतणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. TikTok वर भारतात दीर्घकाळ बंदी घालण्यात आली आहे, परंतु सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शॉर्ट-व्हिडिओ अॅप भारतात पुनरागमन करणार आहे.
TikTok च्या मालकीची कंपनी असलेल्या Byetdance ने भारतात TikTok पुन्हा सुरू (TikTok Trend) करण्यासाठी मुंबईस्थित एका कंपनीसोबत चर्चा सुरू केली आहे. भारतातील अग्रगण्य ईस्पोर्ट्स आणि गेमिंग कंपनी क्षेत्रातील Skyesports कंपनीचे सीईओ यांनी देखील याची पुष्टी केली की, शॉर्ट-व्हिडिओ अॅप भारतात लवकरच परत येत आहे.
भारतातील सर्वाधिक युजर्स असलेल्या TikTok वर 2020 मध्ये भारत सरकारने बंदी घातली होती. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दावर भारत सरकारने TikTok सह इतर 58 अॅप्सवर देखील बंदी घातली होती. Skyesports चे CEO शिवा नंदी म्हणाले की TikTok लवकरच भारतात परत येईल. शिवा नंदी यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर बंदी उठवण्याबाबत संकेत दिले आहे.
सध्या तरी टिक टॉक आणि बीजीएमआयच्या परतण्याबाबत निश्चित दिवस ठरलेला नाही. परंतु कंपनीची मुंबईस्थित आणखी एका कंपनीशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे टिक टॉकच्या पुनरागमनाच्या बातम्या येत आहेत. याशिवाय, TikTok ची मूळ कंपनी ByteDance ने देखील नवीन म्युझिक अॅपसाठी ट्रेडमार्क नोंदणीकृत केला आहे. या म्युझिक अॅपच्या मदतीने कंपनीला संगीत क्षेत्रात आपले पाय रोवायचे आहेत.
शिव नंदी पुढे म्हणाले की, कंपनीच्या अॅपवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली नाही आणि सरकारने याबाबत केवळ अंतरिम आदेश दिला होता. आता शिव नंदीच्या या वक्तव्यानंतर हे दोन्ही अॅप येत्या काळात खरच परतणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.