ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या तुरुंगात आहेत. पत्राचाळ घोटाळ्या (patra chawl scam) प्रकरणी राऊतांना ईडीने अटक केली आहे. या प्रकरणी त्यांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर आज सुनावणी होती. मात्र राऊतांना दिलासा मिळालेला नाही. ईडीच्या उत्तरावर कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. याच कारणामुळे आता या प्रकरणाची सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे. तोपर्यंत राऊतांचा मुक्काम हा तुरुंगातच राहणार आहे.
कोर्टात नेमके काय झाले?
संजय राऊत यांनी कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान ईडीने आज जामिनासंदर्भात लेखी उत्तर कोर्टामध्ये सादर केले. यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. तसेच 9 नोव्हेंबरला या प्रकरणी पुढील सुनावणी केली जाईल असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. याच दिवशी प्रविण राऊत यांच्या जामीनावर देखील सुनावणी होणार आहे. संजय राऊतांच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या वेळी राऊतांचे कुटुंब देखील कोर्टात उपस्थित होते. मात्र पुन्हा एकदा राऊत कुटुंबियांची निराशा झाली आहे.
कधीपासून अटकेत आहेत राऊत?
संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून संजय राऊत हे तुरुंगातच आहेत. या वेळी राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हा पासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत. ईडीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात आहे असा ईडीचा आरोप आहे. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकील करत आहेत. मात्र ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.
ईडीचा आरोप काय?
ईडीने राऊतांवर आरोप केला आहे की, संजय राऊतांचे भाऊ प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते. त्या वेळी त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. यामधील 1 कोटी 6 लाख रुपये हे राऊतांच्या पत्नींच्या खात्यात पाठवण्यात आले. या पैशांमधून त्यांनी अलिबागेत जमीन खरेदी केली. पत्राचाळ प्रकरणात घोटाळा केल्यामुळे राऊत कुटुंबियांना मोठा फायदा झाला असा ईडीचा आरोप आहे. या पत्राचाळ डेव्हलपमेंटमध्ये प्रविण राऊत हे फक्त नावाला होते. मात्र यामागची सर्व सूत्र संजय राऊतच सांभाळत होते असा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.