Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : राज्यपालांच्या एकत्र बैठकीत कोल्हापूरकरांनी आलमट्टी प्रश्नावर केली मोठी मागणी

Kolhapur : राज्यपालांच्या एकत्र बैठकीत कोल्हापूरकरांनी आलमट्टी प्रश्नावर केली मोठी मागणी

कृष्णेच्या पुराचे पाणी प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पुराचा प्रभाव कमी करण्यासाठी २० जून २०२० च्या समन्वय बैठकीतील निर्णयानुसार दरवर्षी १५ ऑगस्टपर्यंत आलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१७ ते ५१७.५० मीटरच्या मर्यादित राखली जावी, अशी मागणी आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केली.

महाराष्ट्र व कर्नाटक समन्वय बैठक राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये झाली. त्यात श्री. रेखावर यांनी आमलट्टीच्या पाणी पातळीकडे कर्नाटकचे लक्ष वेधले. आजरा तालुक्यातील ३.१० टीएमसी क्षमता असलेला किटवडे मध्यम प्रकल्प कृष्णा नदी खोऱ्यातील घटप्रभा उपखोऱ्यात आहे. हा नवा प्रकल्प दोन्ही राज्यांसाठी फायदेशीर आहे. परस्पर सहमत असलेल्या अटी व शर्तीसह आलमट्टीची पाणी पातळी ५१७ मीटर मर्यादेत ठेवावीहा प्रकल्प आंतरराज्य होऊ शकतो, अशी भूमिकाही रेखावार यांनी बैठकीत मांडली.

गोव्यातून अवैध दारू वाहतूक होऊ नये, यासाठी दोन्ही राज्यांच्या उत्पादन शुल्क विभागाने शिनोळी, संकेश्वर, कोगनोळी अंतर्गत मार्गांवर वाहनांची कसून तपासणी करावी, यासाठी एकमेकांशी समन्वय साधावा, गुरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव कमी करणे, पशुखाद्य आणि चाऱ्यासाठी सुलभ व्यापार आणि बाजारपेठ, कर्नाटकातून हत्तीचे स्थलांतर आणि मानव-प्राणी संघर्षात झालेली वाढ, विद्यार्थ्यांना नॅशनल मिन्स स्कॉलरशिप मिळणे, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचा कोविडमुळे कर्नाटकात मृत्यू झालेल्यांना भरपाई, तसेच सीमावर्ती भागात पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी आदी मागण्यांही रेखावार यांनी मांडल्या. कोल्हापूर व कर्नाटक पोलिस यांच्यात समन्वय चांगला असल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

बैठकीला राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राजभवनातील सचिव श्वेता सिंघल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, बेळगावचे प्रादेशिक आयुक्त के. पी. मोहनराज, कलबुर्गीचे प्रादेशिक आयुक्त कृष्णा वाजपेयी, सोलापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, बिदरचे पोलिस अधीक्षक डेक्का बाबू, विजापुराचे अधीक्षक डॉ. आनंद कुमार, उस्मानाबादचे अधीक्षक अतुल कुलकर्णी, सांगलीचे अधीक्षक बसवराज तेली आदी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांत चांगला समन्वय हवा ; राज्यपाल

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा परस्परांमध्ये उत्कृष्ट समन्वय असून तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केल्या. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांना चर्चेतून ज्या काही समस्या राज्यस्तरावरून सोडविल्या जाणे आवश्यक आहे, त्याबाबत राज्य शासनाला सूचित करावे, असेही श्री. कोश्‍यारी यांनी सांगितले. बैठकीबाबत श्री. गेहलोत यांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीला राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राजभवनातील सचिव श्वेता सिंघल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, बेळगावचे प्रादेशिक आयुक्त के. पी. मोहनराज, कलबुर्गीचे प्रादेशिक आयुक्त कृष्णा वाजपेयी, सोलापूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, बिदरचे पोलिस अधीक्षक डेक्का बाबू, विजापुराचे अधीक्षक डॉ. आनंद कुमार, उस्मानाबादचे अधीक्षक अतुल कुलकर्णी, सांगलीचे अधीक्षक बसवराज तेली आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -