ताजी बातमी ऑनलाईन टीम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात हॅगली ओव्हल क्राइस्टचर्च मैदानावर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने 47.3 षटकांत 219 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 18 षटकांत 1 बाद 104 धावा केल्या. मात्र पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
तिसरा एकदिवसीय सामना रद्द झाल्यानंतर न्यूझीलंडने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-0 अशी जिंकली आहे. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात भारतावर 7 गडी राखून विजय मिळवला होता, तर दुसरा एकदिवसीय सामनाही पावसामुळे होऊ शकला नाही. दरम्यान या दौऱ्यावर याआधी भारताने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-0 ने जिंकली आहे.
पावसामुळे खेळ थांबेपर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या 1 बाद 104 धावा होती. किवी संघाला हा सामना जिंकण्यासाठी 32 षटकात 116 धावांची गरज होती. डेव्हन कॉनवेने 51 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 38 धावा केल्या. त्याच्यासोबत केन विल्यमसनने तीन चेंडू खेळूनही त्याचे खातेही उघडले नव्हते. पंचांनी प्रचलित परिस्थिती लक्षात घेऊन सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ-लुईस-स्टर्न आधारावर न्यूझीलंड 50 धावांनी पुढे होता. परंतु यासाठी मैदान खेळण्यासाठी योग्य घोषित करणे किंवा किमान 20 षटके पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र तसे होऊ शकले नाही आणि पंचांकडून सामना रद्द घोषित करण्यात आला.