ताजी बातमी ऑनलाईन टीम
माफिया डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने (पीएमएलए कोर्ट) मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी त्यांचा जामीन नाकारला. विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला.
नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 14 नोव्हेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. त्याआधी या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) नेते मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मनी लाँड्रिंगचा खटला चालवण्यासाठी कोणताही गंभीर गुन्हा नसल्याचा युक्तिवाद करत मलिक यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. मलिक यांनी त्यांच्या वकिलामार्फत पीएमएलए कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या आधारे तपास यंत्रणेने जामिनाला विरोध केला, त्यानंतर कोर्टाने मलिकांचा जामिन अर्ज फेटाळला आहे.