राज्यात गोवरचा प्रसार झपाट्याने होत आहे. कोरोनाच्या वेगाच्या पाचपटीने हा संसर्ग राज्यभरात पसरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ही समस्या लक्षात घेत गोवरच्या नियंत्रणासाठी आता लस मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेसाठी लहान मुलांना मास्क बंधनकारक करण्याचे संकेत देण्यात आले आहे.
मास्क बंधनकारक
गोवरची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मुंबईत आतापर्यंत 428 बालकं गोवरबाधित आढळली असून 12 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोवरचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी मुलांना मास्क बंधनकारक करा, असं मत राज्याच्या गोवर प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले आहे. गोवरबाधितांच्या थुंकीतून हा आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लहान मुलांचं गोवरच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी मास्कची मदत होईल, असं मत साळुंखेंनी व्यक्त केले.
राज्यभर राबवणार लसीकरण मोहीम
दरम्यान, कोरोनानंतर राज्यावर गोवरच नवीन संकट निर्माण झालं आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. गोवरचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे. अशात गोवरशी लढण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. गोवरवर मात करण्यासाठी लसीकरण करण्याचे ठरविले आहे.
राज्य कृतिदलाकडून गोवरला प्रतिबंध करण्यासाठी राज्यामध्ये दोन टप्प्यांममध्ये लसीकरण होणार आहे. या मोहीमत नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील एकही लशीची मात्रा न घेतलेल्या बालकांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. पहिला टप्प्या 15 ते 30 डिसेंबर तर दुसरा टप्पा हा 15 ते 26 जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे. या दोन टप्प्यात बालकांना डिसेंबरमध्ये पहिली मात्रा तर जानेवारीमध्ये दुसरी मात्रा देण्यात येणार आहे.
गोवर-रुबेलासाठी ही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातील बालकांची गणना केली जाते आहे. जिल्हा, तालुका, पालिका आणि नगरपालिकासह विभागनिहाय अगदी वॉर्डनिहाय बालकांची मोजणी केली जाणार आहे. दोन टप्प्यात होणारे ‘मिशन गोवर’ 26 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.