ताजी बातमी ऑनलाईन टीम
आमदार हसन मुश्रीफ यांचा कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर कागल शहरातील चौका चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत आज (दि. २) गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. ठीकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्ते जल्लोष करीत होते.
शहरातील गैबी चौक, खर्डेकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सर्व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्यांचे वातावरण निर्माण झाले होते. तरुणांनी शहरातून मोटरसायकलची रॅली काढली. कार्यकर्ते गुलाल लावून एकमेकांना अलिंगन देत होते. ग्रामीण भागातील कार्यकर्ते देखील शहराकडे धाव घेत होते. गावागावांमध्ये देखील कार्यकर्ते जल्लोष करत असल्याचे दिसून येत होते.
महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाने हादरले आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी फूट पडली आहे. आज रविवारी (दि.2) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राजभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता हे फक्त शिंदे-फडणवीस सरकार राहिले नसून शिंदे-फडणवीस-अजित पवार यांचे सरकार झाले आहे. अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, धर्मराव आत्राम, संजय बनसोडे, आणि अनिल भाईदास पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.