Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीधक्क्यावर धक्के… ठाकरे गटाचे लागोपाठ दोन नेते अडचणीत; रवींद्र वायकर यांची आर्थिक...

धक्क्यावर धक्के… ठाकरे गटाचे लागोपाठ दोन नेते अडचणीत; रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी

ठाकरे गटासाठी आजचा दिवस धक्क्यावर धक्के देणारा आहे. कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ही बातमी धडकलेली असतानाच दुसरी बातमी येऊन धडकली आहे. ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते, माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. सध्या वायकर हे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. त्यामुळे ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.

रवींद्र वायकर यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. जोगेश्वरी येथील हॉटेल संदर्भात ही तक्रार होती. मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधली आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. वायकर हे सध्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात असून त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाबाबत वायकर यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. मात्र, या चौकशीमुळे वायकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किशोरी पेडणेकर अडचणीत
ठाकरे गटाच्या दुसऱ्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात जी औषध खरेदी झाली होती. ती चढ्या दराने करण्यात आली होती. तसेच मृतांसाठी घेण्यात आलेली बॉडी बॅगही चढ्या भावाने घेतली होती. पाचशे रुपयांची बॉडी बॅग सहा हजार रुपयांना घेण्यात आली होती. हे कंत्राट किशोरी पेडणेकर यांच्या सांगण्यावरूनच देण्यात आल्याचा आरोप आहे. शिवाय हे कंत्राट द्यायला काही अधिकाऱ्यांचा विरोधही होता. तरीही हे कंत्राट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांचा कालच इशारा
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोव्हिड घोटाळ्यावरून कालच इशारा दिला होता. ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केला, त्यांना सोडणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. लोक मरत असताना काही लोक मात्र, घोटाळ्यात मग्न होते. पैसे कमवत होते, असा आरोप त्यांनी केला होता. बाजार भावाच्या दरापेक्षा कितीतरी पट किंमतीने औषध खरेदी करण्यात आली. बॉडी बॅग्ज अव्वाच्या सव्वा किंमतीत खरेदी करण्यात आले, या सर्वांवर कारवाई होईल, असा इशारा शिंदे यांनी दिला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -