कृष्णानगर परिसरातील संतप्त महिला व नागरिकांनी पाण्यासाठी शहापूर – विक्रमनगर रस्त्यावर घागरीसह रास्तारोको आंदोलन केले. सुमारे अर्धातासाहून अधिक चाललेल्या आंदोलनामुळे सदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, महानगरपालिकेचे अभियंता बाजी कांबळे यांनी भागात मुबलक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
येथील कृष्णानगर भागात काही महिन्यांपासून नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. काही भागात कमी दाबाने तर काही भागात अत्यल्प प्रमाणात पाणी येत असल्याने नागरिकांची विशेषतः महिला वर्गाला वणवण करावी लागत आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शुक्रवारी अचानकपणे विक्रमनगर – शहापूर रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन सुरु केले.
या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलिस ठाण्याचे निरिक्षक सत्यवान हाके यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते. अखेर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता बाजी कांबळे हे आंदोलनस्थळी आले. त्यांनी नागरिकांशी चर्चा करत भागात सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
पाण्यासाठी विक्रमनगर परिसरातील संतप्त महिलांनी रास्तारोको केला. यावेळी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात आबा बनसोडे, कौशल्या गाडे, शालन बनसोडे, रेहाना मुल्ला, कांचन बनसोडे, बाळू सौदागर, जयवंत पाटील, संतोष बनसोडे, बाबासाहेब नलवडे आदींसह नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या.






