हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार सध्या राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
आज राज्यातील मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कर्नाटक, गोवा आणि केरळ किनारपट्टीवरील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
एकीकडे राज्यभरात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे मराठवाड्यात (Marathwada) आज मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या मराठवाड्याला आज बाप्पा पावणार आहे. 27 ते 30 सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळं आज दुपारनंतर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
देशाच्या विविध भागात आज हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, आंध्र प्रदेशसह केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशातील काही भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. यंदा मान्सून माघारी फिरण्यास काहीसा उशिर झाला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास यावर्षी आठ दिवस उशिराने सुरु झाला आहे.
नैऋत्य मोसमी मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. राजस्थानमधून नैऋत्य मान्सून माघारी फिरला आहे. वायव्य आणि लगतच्या पश्चिम भारतातील आणखी काही भागांतून पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 29 सप्टेंबरपासून पूर्व भारतात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.