केंद्र सरकारने पेन्शन देणाऱ्या सर्व बँकांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. अंथरुणाला खिळून असलेल्या किंवा रुग्णालयात भरती असलेल्या पेन्शन धारकांचं लाईफ सर्टिफिकेट आता बँक कर्मचारी स्वतः जाऊन कलेक्ट करणार आहेत. यामुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
केंद्राच्या पेन्शन आणि पेन्शन धारक कल्याण विभागाने (DOPPW) याबाबतचा आदेश दिला आहे. 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सुपर-सीनियर पेन्शनर्सना डिजिटल माध्यमातून लाईफ सर्टिफिकेट बनवण्यास मदत करावी, तसंच याबाबत जागरुकता निर्माण करावी असंही बँकांना सांगण्यात आलं आहे.
पेन्शन मिळवणाऱ्या व्यक्तीला दर वर्षी आपण जिवंत असल्याचा पुरावा बँकेला द्यावा लागतो. यासाठी हयातीचा दाखला, म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट बँकेत जमा करावं लागतं. हा दाखला जमा केला नाही, तर त्या व्यक्तीची पेन्शन बंद होऊ शकते.
कित्येक वयोवृद्ध व्यक्ती हे विविध प्रकारच्या आजारांमुळे अंथरुणाला खिळून असतात. तर कित्येक रुग्णालयांमध्ये भरती असतात. अशा वेळी त्यांचा हयातीचा दाखला बँकेत जाऊन भरणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. सध्या केंद्र सरकारकडून सुमारे 69.76 लाख लोक पेन्शन घेतात.
DOPPW विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता पेन्शन धारक घरबसल्या देखील डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकणार आहे. यासाठी फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येईल. यामुळे स्मार्टफोनच्या मदतीने देखील डिजिटल हयातीचा दाखला भरता येऊ शकेल.
केंद्राच्या 2019 साली दिलेल्या आदेशानुसार, 80 वर्षांपेक्षा जास्त वय असणारे सुपर सीनियर हे ऑक्टोबर महिन्यापासून आपला हयातीचा दाखला जमा करू शकतात. तर, त्याहून कमी वयाचे व्यक्ती नोव्हेंबर महिन्यापासून आपलं लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकतील.
त्यामुळे आता कदाचित बँका ऑक्टोबर महिन्यापासून सुपर-सीनियर पेन्शनर्सचा हयातीचा दाखला कलेक्ट करण्यासाठी ऑक्टोबर महिन्यापासून मोहीम राबवू शकतात.