राज्य शासनाकडून देण्यात येणार्या आनंदाच्या शिधामध्ये यंदाच्या दिवाळीत पोहे व मैदा या दोन वस्तूंची भर घातली आहे. यंदा जिल्ह्यात आतापर्यंत 2.20 लाख किट जिल्हापुरवठा विभागाकडे प्राप्त झाल्या असून दिवाळी सणापूर्वीच रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा मिळणार असून 2 नोव्हेंबरपासून वाटपास सुरुवात होण्याची शक्यता पुरवठा विभागाने वर्तविली आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या वर्षीच्या दिवाळीपासून प्रत्येक मोठ्या सणाला अंत्योदय, प्राधान्य गट आणि एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याची घोषणा करण्यात आली. या अनुषंगाने राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र, मागील वर्षीच्या दिवाळीत शासनाचे नियोजन चुकले होते. त्यामुळे अनेकांना दिवाळी सणानंतर किट मिळाल्याचे वास्तव आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत मात्र, लाभार्थ्यांना 12 दिवसापूर्वीपासूनच किट वाटपाला सुरुवात करण्याचा बेत शासनाचा आहे. जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत 2 लाख 42 हजार 12 लाभार्थी कुटुंबांना या किटचे वितरण करण्यात येणार असून आतापर्यंत जिल्हा पुरवठा विभागाकडे 2 लाख 20 हजार 998 किट प्राप्त झाल्या आहे. त्यात जिल्हा पुरवठा विभागही किट वाटपासाठी सज्ज झाला असून सर्व तालुक्यांना किट वाटप प्रक्रियेला सुरुवात केली आहे. तर 1 नोव्हेंबरपासून रेशनच्या लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटपाला सुरुवात होण्याची शक्यता पुरवठा विभागाने वर्तविली आहे.
शासनातर्फे सर्वेक्षणानुसार शंभर टक्के किट वाटपाचा लक्ष्य असून जिल्ह्यात 2 लाख 42 हजार 12 शिधा किट मंजूर करण्यात आले आहे.
यात प्रति कार्ड 100 रुपयात शिधाची पिशवी देण्यात येणार आहे. यात रवा, साखर, चनाडाळ व पामतेल सह आता मैदा व पोहे हे जिन्नस लाभार्थ्यांना देण्यात येईल. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालयांना या किट पाठविण्याची प्रक्रीया सुरु झाली असून 1 किंवा 2 नोव्हेंबरपासून रेशन दुकानातून लाभार्थ्यांना किट वाटपाला सुरुवात करण्याची शक्यता आहे.