काही उमेदवार भाजपच्या (BJP) कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे. शिवसेनेकडून उमेदवारीची अपेक्षा लावून असलेले खासदारही या शक्यतेला स्पष्टपणे नाकारत नाही आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, राजकारणात एका रात्रीत बदल घडत असतात असे सूचक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे रामटेक लोकसभा मतदारसंघातील खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी केले आहे. महायुयीत (Mahayuti) जागा वाटपाचा तिढा सुटला नाही,
तर स्थानिक परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेचे काही उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील का? या थेट प्रश्नावर तुमाने यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. तुमाने म्हणाले, भाजप – शिवसेना युती भक्कम आहे आणि दोन्ही पक्ष नेहमीच एकमेकांच्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी काम करत असतात.
आम्ही कोणत्या चिन्हावर निवडणूक लढू या संदर्भात सध्या होकार किंवा नकार देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही ज्या चिन्हावर निवडणूक लढलो होतो, त्याच चिन्हावर पुढेही निवडणूक लढवण्याबद्दल आम्हाला मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबतच्या सर्व तेरा खासदारांना निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत दरम्यान, मागच्या वेळेला ज्या 18 जागा आम्ही जिंकलो होतो त्या सर्व 18 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे.
राष्ट्रवादीला 22 जागा दिल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसने काय करायचे? खासदार तुमानेंचा सवाल
दरम्यान महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वरूपाने तिसरा भिडू आला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेच्या फार जागा मिळू शकणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मागच्या वेळेला फक्त चार जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीच्या जागा वाटपात आमच्या एवढ्या 22 जागा मागितल्या तर भाजपने काय करायचं असा सवाल ही तुमाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारला आहे. राष्ट्रवादीला त्यांच्या शक्तीप्रमाणे कमी जागेवर समाधान मानावे लागेल असेही तुमाने म्हणाले.
जानेवारीअखेरपर्यंत महायुतीचे जागावाटप स्पष्ट होईल
निवडणुका तोंडावर आल्या असताना अद्याप महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही यावर उत्तर देताना तुमाने म्हणाले, तिन्ही पक्षातील सर्वोच्च नेते जागा वाटपाबद्दल चर्चा करून तिढा सोडवतील. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत महायुतीचा जागावाटप स्पष्ट होईल.