युद्ध केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाही; त्याचे चटके (War Impact) आता थेट भारतीयांपर्यंत पोहोचले आहेत. इराणमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत झाला असून, भारतातून होणारी निर्यात आणि तिथून येणारी आयात दोन्ही थांबली आहे.
इराण हा जगातील सुका मेव्याचा मोठा उत्पादक आहे. युद्धामुळे तिथून होणारी आवक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी, बाजारात साठा कमी झाल्याने दर गगनाला भिडले आहेत.
पिस्ता: 1650 रुपयांवरून थेट 2400 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
मामरा बदाम: 1800 रुपयांवरून 2800 रुपयांपर्यंत झेप घेतली असून तब्बल 55 टक्क्यांची वाढ झाली आहे.
जर्दाळू: 750 रुपयांचा जर्दाळू आता 1400 रुपयांना मिळत आहे. 85 टक्क्यांची ही वाढ ग्राहकांचे बजेट कोलमडवणारी ठरत आहे.
एकीकडे आयात महागली असताना, दुसरीकडे भारतीय शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. इराण हा भारतीय बासमती तांदळाचा मोठा खरेदीदार आहे. मात्र, निर्यात थांबल्याने देशांतर्गत बाजारात तांदळाचा खच पडला असून दर 16 टक्क्यांनी घसरले आहेत. महाराष्ट्रभरातून इराणला जाणारा कांदा, मका, मिरची आणि डाळिंबाचे अनेक कंटेनर दुबईत अडकले आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.






