कल्याण शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. शहरात कधी अल्पवयीन मुलींची छेड काढण्यापासून हत्येच्या घटना घडतात, कधी महिलांवर अत्याचारा घडना घडतात, कधी खून तर कधी चोरीच्या घटना समोर येतात. कधीकधी दोन गटात तुफान राड्याच्या घटना समोर येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्याने बघावं अशी मागणी सातत्याने सर्वसामान्यांकडून केली जात आहे. पण तरीही अशा घटना काही केल्या कमी होताना दिसत नाही. नुकतंच अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिरात प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने देशभरात जल्लोष करण्यात आला.
पण कल्याणमध्ये काही जणांनी फटाके फोडण्यावरुन दोन गटात प्रचंड मोठा राडा झाला. विशेष म्हणजे मध्यस्थी करणारा तिसरा गटही या राड्यात सहभागी झाला आणि अभूतपूर्व असा भयानक, भीतीदायक असा राडा कल्याणकरांच्या निदर्शनास आला.विशेष म्हणजे या राड्यात स्ट्राँग बॅट, लोखंडी रॉड यांचा वापर करण्यात आला. तीन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. विशेष म्हणजे ही हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. विशेष म्हणजे एका बाजूला रस्ता सुरु आहे. वाहनांची ये-जा सुरु आहे. अशा परिस्थितीत एका चारचाकी गाडीतून काहीजण निघतात. ते लोखंडी रॉड आणि बॅटने इतरांवर हल्ला करतात. अतिशय भयानक असा हा प्रकार आहे.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही कल्याण पूर्वीतील मलंगगड रोड परिसरात असलेल्या जानकी ग्लोबल रुग्णालयासमोर घडली. काही तरुण फटाके फोडत होते. यावेळी एका गटाने त्यांना हटकले. यावरुन दोन्ही गटांमध्ये आधी शाब्दिक चकमक सुरु झाली. त्यानंतर हाणामारी सुरु झाली. यावेळी तरुणांचा तिसरा गट तिथे मध्यस्थीसाठी आला. पण त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पुन्हा मोठा राडा झाला. तीनही गटांमध्ये जोरदार हाणामारी आणि शिवीगाळ सुरु झाली. जवळपास अर्धा ते पाऊण तास हा राडा सुरुच होता.
या राड्यादरम्यान काही तरुण जखमी झाले आहेत.संबंधित घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नेमकी काय घटना घडली याची माहिती जाणून घेतली. यावेळी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी तीनही गटाच्या विरोधात भादवी 324, 326 आणि रायटिंगची कलमे लावली आहेत. पोलिसांनी 20 ते 25 जणांना आरोपी केले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. कल्याण पूर्वेत राड्याची ही पहिलीच घटना नाही. काही ना काही निमित्ताने या भागात सातत्याने वाद आणि राडे होतच राहतात. पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई केली पाहिजे. या तरुणांना समुपदेशानाचीही गरज आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.