राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदल झाल्याचे दिसून(farmers) येत आहे. राज्याच्या काही भागात उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे तर काही भागत पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांचा पारा ३५ ते ४० पर्यंत पोहचला असतानाच दुसरीकडे हवामान विभागाने विदर्भातील काही भागात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे.
विदर्भात हवामान विभागाने 17 ते 19 मार्चदरम्यान ऑरेंज अलर्ट(farmers) जारी केला आहे. विदर्भाशिवाय मराठवाड्यातही 19 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा कोणताही अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला नाही. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
काल(शनिवारी) पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. नागपूरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाला. राज्याच्या काही भागात अवकाळीचं सावट कायम आहे. नागपूरसह भंडारा-गोंदिया जिल्ह्याला पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील ३ ते ४ दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे, मुंबई, सोलापूरसह काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका वाढला आहे. मार्च महिन्यातच उकाड्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान आणि कमाल तापमानात वाढ होताना दिसत आहे.
महाराष्ट्रासह पुढील चार दिवसांत केरळ, माहे, रायलसीमा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये उष्ण आणि दमट हवामान असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य भारतातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.