सांगली-कोल्हापूर मार्गावरील अंकली येथे आंतरजिल्हा तपासणी नाक्यावर मालट्रकमधून होत असलेली गुटखा तस्करी सांगली ग्रामीण पोलीसांनी उघडकीस आणून सुमारे १५ लाखाचा गुटखा, सुगंधी तंबाखू जप्त केली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क विभागातून रविवारी देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हद्दीच्या ठिकाणी तपासणी नाके कार्यरत करण्यात आले आहेत. अंकली येथे मालट्रक (एमएच ५०-७४२९) तपासणी नाक्यावर आला असता चौकशीसाठी थांबण्याचा इशारा पथकातील पोलीस रमेश पाटील, असिफ नदाफ व सतिश सातपुते यांनी केला. मात्र, पोलीसांच्या इशार्याकडे दुर्लक्ष करून ट्रक तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून थांबविण्यात आला.ट्रकमधील मालाची तपासणी केली असता टोबॅको हॅपी होली, विमल गुटखा, आरएमडी सुगंधी तंबाखू, पानमसाला असा प्रतिबंधित माल आढळून आला.
याची किंमत १४ लाख ८५ हजार ९२० रूपये असून सात लाखाच्या ट्रकसह सर्व माल जप्त करण्यात आला. ही कारवाई उप अधिक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षम राजेश रामाघरे यांच्या पथकाने केली. या प्रतिबंधित मालाची वाहतूक केल्या प्रकरणी सलीम मुजावर (वय ३५ रा. शंभर फुटी रोड, सांगली) आणि इरशाद मुलाणी (रा. ख्वॉजा कॉलनी, मिरज) या दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.