इचलकरंजी/प्रतिनिधी –
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2023-24 मधील जिल्हास्तरीय शालेय शासकीय क्रीडा स्पर्धेमध्ये 14 व 17 वर्षाखालील मुले-मुली दोन्ही गटांमध्ये डीकेटीई सोसायटीच्या मराठी मिडीयम हायस्कूल नारायण मळा या प्रशालेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर 1 लाख 67 हजार रुपये प्रोत्साहनपर शासकीय अनुदानही मिळविले आहे.
प्रोत्साहनपर अनुदान दोन्ही गटामध्ये मिळवणारी इचलकरंजी शहरातील पहिलीच शाळा आहे.
हे अनुदान शाळेमध्ये आयोजित विविध क्रीडाविषयक उपक्रम, विविध सांघिक, वैयक्तिक खेळ या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग, स्पर्धेतील यश, प्रविण्य या घटकावर गुणांकन केले जाते. यावेळी मराठी मिडीयम हायस्कूल नारायण मळा प्रशालेने या गुणांकनात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
शाळेमध्ये नियमितपणे कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, रग्बी, रस्सीखेच यांसारखे सांघिक खेळ तसेच कुस्ती, ज्युदो, धनुर्विद्या, कॅरम, बुद्धिबळ, थाळी व गोळा फेक, भाला फेक, लांब उडी, उंच उडी, धावणे या वैयक्तिक क्रीडाप्रकारांचे मार्गदर्शन केले जाते. आजपर्यंत शाळेने अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविले असून सध्या पोलीस, आर्मी, रेल्वे, पोस्ट, एमएसईबी, पाटबंधारे इत्यादी शासकीय सेवेमध्ये ते अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
या यशाबद्दल डीकेटीई सोसायटीचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, डॉ. राहुल आवाडे,संस्थेच्या मानद सचिव सौ. डॉ. सपना आवाडे, संचालक रवि आवाडे, राजू कुडचे, शेखर शहा, सर्जेराव पाटील, भूपाल कागवाडे, स्वानंद कुलकर्णी, संस्थेचे एओ जयपाल हेरलगेे आदींनी मराठी मिडीयम हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. एच. गाडेकर, क्रीडा शिक्षक व विभाग प्रमुख संभाजी बंडगर, कार्तिक बचाटे, बजरंग निर्मळ व सर्व क्रीडा मार्गदर्शक यांचा सत्कार केला.