आयुष्यात थ्रील करण्याच्या नादात तरुणाईला आपण काय चूक करतोय, याचं अजिबात भान राहत नाही. गुजरातमधील आणंदमध्ये असाच एक प्रकार समोर आला. इन्स्टाग्रामावर लाईव्ही स्ट्रीमिंग करुन अतिवेगाने कार चालविणाऱ्या मित्रांची चूक इतर दोघांच्या जीवावर बेतली. 180 किमीचा वेगाने जाणाऱ्या कारवरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा मृत्यू झाला. तरर इतर जण गंभीर जखमी झाले. रात्रीच्या वेळी केलेला हा थरार अंगलट आला.
अहमदाबाद येथील 22 वर्षीय आसिफ पठाण, त्याचा मित्र शाहबाज खान पठाण, जैनुल जहीर भाई दिवाण, फुजेल खान रसीद खान पठाण, चिराग भाई पटेल, अमन शेख आणि तमीम खान पठाण हे 7 मित्र 2 मे रोजी मुंबईसाठी रवाना झाले. रात्री 12 वाजता ते अहमदाबाद येथून निघाले. त्यांच्याकडे ब्रीझा कार होती. ही कार तमीम खान पठाण चालवत होता. तर त्याचवेळी तो इन्स्टाग्राम लाईव्ह पण करत होता.
कारवरील नियंत्रण सुटले
हे सर्वजण सकाळी जवळपास साडेतीन वाजता आणंद ते बडोदा जाणाऱ्या महामार्गावर होते. अडास हे गाव त्यांना लागले. त्याचवेळी एका ट्रकला ओव्हरटेक करताना तमीम खानचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावरील एका झाडाला जाऊन धडकली. या घटनेत चिराग पटेल आणि अमन शेख हे जागीच ठार झाले. तर आसिफ खान पठाण, जैनुल दिवाण, तमीम खान आणि फुजेल खन, राशिद खान पठाण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. आसिफ खान पठाण याच्या तक्रारीवरुन कार चालवत असलेल्या तमीम खानविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला.
2 मे रोजी मध्यरात्रीच्या या अपघाताची सोशल मीडियावर पण चर्चा सुरु आहे. कार चालविणारा तमीम खान पठाण त्याच्या सोशल मीडियावर कार चालवत असतान लाईव्ह स्ट्रीमिंग करत होतो हे उघड झाले. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी त्याने कारचा वेग एकदम वाढवला. हा वेग जवळपास 180 किमीच्या घरात पोहचला. त्याचवेळी तो ट्रकला ओव्हरटेक करत होता. हे सर्व लाईव्ह रेकॉर्ड होत होते. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या चक्करमध्ये तमीम खानचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट एका झाडावर जाऊन आदळली.