नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी सकाळी दिवसाढवळ्या घडलेल्या एका खळबळजनक हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खापरखेडा-कोराडी रोडवर पती-पत्नीने मिळून एका तरुणावर धारदार चाकूने अनेक वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख सागर वानखेडे (रा. सावंगी, ता. नरखेड, जि. नागपूर) अशी झाली आहे. सागर हा पुण्यात नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये (रा. वार्ड क्रमांक २, खापरखेडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनाली गजभिये आणि सागर वानखेडे यांच्यात शिक्षण घेत असताना प्रेमसंबंध होते. मात्र पुढे सोनालीचे लग्न राजू गजभिये याच्यासोबत झाले. लग्नानंतरही सोनाली आणि सागर यांच्यात संपर्क कायम असल्याचे समजते. या कारणावरून राजू गजभियेने यापूर्वी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
दरम्यान, होळीच्या सणानिमित्त सागर पुण्यावरून आपल्या सावंगी गावात आला होता. त्यावेळी त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोनालीला मेसेज पाठवून भेटण्यासाठी बोलावले. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास सागर खापरखेडा येथे पोहोचला. श्याम मंगल कार्यालयाजवळ सोनाली त्याच्या दुचाकीवर बसली आणि दोघेही तेथून निघाले.
यावेळी सोनाली आपल्या सोबत एक चाकू घेऊन गेल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे राजू गजभियेने मुलांना शाळेत सोडल्यानंतर दोघांचा पाठलाग सुरू केला.
खापरखेडा-कोराडी मार्गावर कोलार नदीचा पूल ओलांडल्यानंतर सोनालीने मुद्दाम आपली पर्स खाली पाडली. सागरने दुचाकी थांबवून पर्स उचलण्यासाठी खाली वाकताच सोनालीने चाकू काढून त्याच्यावर दोन वार केले. त्याच वेळी घटनास्थळी पोहोचलेल्या राजू गजभियेनेही सागरवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी आपल्या घरी परतले.
त्यानंतर ते पोलिस ठाण्यात जात असताना पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या सागर वानखेडेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोराडी पोलीस करत आहेत.






