पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मोदी यांच्या मंत्रिमंडळात एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना स्थान देण्यात आलं आहे. फक्त अजित पवार गटाला मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. भाजपने केरळमधील आपल्या एकमेव खासदारालाही मंत्रिपद दिलं आहे. मात्र हा खासदार मंत्रिपद सोडण्याच्या तयारीत आहे.
केरळमधील भाजपचे एकमेव आणि पहिले खासदार सुरेश गोपी यांनी काल केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यमंत्री म्हणून त्यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. पण गोपी हे आता मंत्रिपद सोडण्याची शक्यता आहे. एका प्रादेशिक वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मंत्रीपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी मंत्रिपद मागीतलं नव्हतं. मला पक्षश्रेष्ठी या पदावरून मोकळं करतील अशी आशा आहे, असं सुरेश गोपी यांनी म्हटलंय.
सुरेश गोपी यांनी मंत्रीपद सोडण्यासाठीची अनेक कारणे सांगितली आहेत. मी अनेक सिनेमे साईन केले आहेत. ते पूर्ण करायचे आहेत. तसेच त्रिशूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मला काम करायचं आहे. त्यासाठी मोकळा वेळ हवा आहे, असं सुरेश गोपी यांनी स्पष्ट केलं. सुरेश गोपी हे केरळमधून निवडून आलेले भाजपचे पहिले खासदार आहे. केरळमधील भाजपचा हा पहिला विजय आहे. सुरेश गोपी हे त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचा पहिला खासदार म्हणून इतिहासात स्वत:चं नाव कोरलं आहे. त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार व्ही. एस. सुनीलकुमार यांचा 74,686 मतांनी पराभव केलाय.
सिनेमे पूर्ण करायचे
एक खासदार म्हणून काम करणं हा माझा हेतू आहे. मी काहीच मागितलं नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही असं मी सांगितलं होतं. मला वाटतं मी लवकरच या पदावरून मुक्त होईल. त्रिशूरच्या मतदारांनाही त्याची काही अडचण नाही. एक खासदार म्हणूनच मी त्यांच्यासाठी चांगलं काम करू शकेल, हे मतदारांना माहीत आहे. मला कोणत्याही परिस्थितीत माझे अर्धवट सिनेमे पूर्ण करायचे आहेत, असं सुरेश गोपी यांनी स्पष्ट केलं.
राज्यसभेचंही प्रतिनिधीत्व
गेल्यावेळी त्रिशूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या खात्यात गेला होता. सुरेश गोपी खासदार म्हणून निवडून येण्यापूर्वी राज्यसभेचे सदस्य होते. त्यांना 2016मध्ये राज्यसभेवर घेण्यात आलं होतं. 2022पर्यंत त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ होता.
बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात
सुरेश गोपी हे केरळच्या अलप्पुझा येथील रहिवासी आहे. 1958मध्ये जन्मलेल्या सुरेश गोपी यांनी कोल्लम येथून सायन्स विषयात पदवी घेतली होती. त्यांनी इंग्रजी लिटरेचरमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. सुरेश गोपी हे एक उत्कृष्ट अभिनेते आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून सिनेमात काम सुरू केलं होतं. अनेक सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. 1998मध्ये आलेल्या कलियाट्टम सिनेमातील कामाबद्दल त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याशिवाय एका टीव्ही शोचे होस्ट म्हणूनही ते काम पाहत आहेत.