लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी तालुक्यातील वनविभागाच्या वनक्षेत्रपाल (वनपरिक्षेत्र अधिकारी) कौशल्या हणमंत भोसले (वय 32, रा. तासगाव) यांच्यावर कारवाई केली. कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत तुकाराम शिंदे (वय 43, रा. मणेराजुरी, ता. तासगाव) याच्या माध्यमातून लाच स्वीकारत असताना ही कारवाई झाली आहे.
लाकूड वाहतूक करताना पकडलेले वाहन सोडण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेण्यात आली. कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या लाचप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेली माहिती अशी ः तक्रारदार यांचा लाकूड वाहतुकीचा ट्रक वनविभागाने एक महिन्यापूर्वी पकडला होता. तो सोडून देण्यासाठी वनक्षेत्रपाल भोसले यांनी 30 हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने तक्रारीनुसार तासगाव शहरात सापळा रचला. गुरुवारी तक्रारदारास भोसले यांच्याकडे पाठविले. भोसले यांनी “तुझा ट्रक सोडायचा असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील” असे सांगितले.
या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पुन्हा तक्रारदाराला 30 हजार रुपये घेऊन पाठवण्यात आले. त्यावेळी भोसले यांनी ती रक्कम वन विभाग कार्यालयातील ऑपरेटर श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार तक्रारदार रक्कम घेऊन शिंदे यांच्याकडे गेला. ती रक्कम स्विकारत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. भोसले यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, पोलिस अंमलदार अविनाश सागर, धनंजय खाडे, संजय संकपाळ, सलीम मकानदार, अजय पाटील, राधिका माने, विना जाधव, श्रीपती देशपांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.