माझा कारखाना अडचणीत नाही. माझ्या कोणत्याही सभासदाला विचारुन घ्या. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मागील १२ वर्षांपासून नियमित पैसे देत आहे. अमोल मिटकरी याचा ट्विट करण्याचा धनी किंवा त्याचा बोलविता धनी कोण आहे? हे अमोल मिटकरी यांनी सांगावे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर आता दुसरा पार्ट सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार आणि अजित पवार गटाबाबत आमदार अमोल मिटकारी यांनी ट्विट केले आहे. या ट्विटनंतर राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. अमोल मिटकरी यांच्या दाव्यानुसार, बीडमधून विजय झालेले शरद पवार गटातील खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अमोल मिटकरी यांचा ”बीडच्या बप्पाचा दादांना फोन” या चार शब्दांच्या ट्विटनंतर राज्यातील राजकारणात भूकंप आला आहे. त्यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी ”टीव्ही ९ मराठी”शी बोलताना सर्व घडामोडी स्पष्ट केल्या आहेत.
काय म्हणतात बजरंग सोनवणे
अमोल मिटकरी यांच्या ट्विटनंतर ”टीव्ही ९ मराठी”शी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, अमोल मिटकरी कोण आहेत? ते अजित दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? कारण ऑपरेटर कडेच फोनचे रेकॉर्ड असते. माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच बीड जिल्ह्यातील जनता मला चपलेने मारेल. पवार साहेबांना सोडायचे म्हटल्यावर तर माझे वडील मला कानसुलीत लगावतील. माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल.
राजकारणापलीकडे विषय असतात…
राजकारणाच्या पलीकडे काही विषय असतात, मात्र हे राजकारणावर का आणतात हे मला समजत नाही, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरी आणखी एका ट्विटमध्ये म्हणतात, कारखाना अडचणीत असेल म्हणून हा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. परंतु एखाद्या अडचणीसाठी एवढा मोठा निर्णय मी घेणार नाही. मला शरद पवार साहेबांनी, जयंत पाटील यांनी निवडणूक लढवण्यास सांगितले. मी त्या दोघांना शब्द दिला. त्यानंतर मी लढलो अन् निवडून आले.
बोलविता धनी कोण आहे?
माझा कारखाना अडचणीत नाही. माझ्या कोणत्याही सभासदाला विचारुन घ्या. बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मागील १२ वर्षांपासून नियमित पैसे देत आहे. अमोल मिटकरी याचा ट्विट करण्याचा धनी किंवा त्याचा बोलविता धनी कोण आहे? हे अमोल मिटकरी यांनी सांगावे. विधानसभेत आमच्या 200 च्या वर जागा येतील. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. हे मी जबाबदारीने सांगतो. मराठवाड्यात शंभर टक्के निकाल आम्ही देणार आहे. आता पक्ष जो माझ्यावर मराठवाडयातील विधानसभेची जबाबदारी देईल तेवढं मी पार पाडेन.