अमेरिकेमध्ये भारतातल्या प्रसिद्ध पीएनजी ज्वेलर्सचं शॉप 20 चोरांनी लुटलं आहे. ही चोरी एखाद्या चित्रपटाच्या सीन एवढीच थरारक होती. फक्त 3 मिनिटांमध्ये चोरांनी पूर्ण दुकान खाली केलं.
कॅलिफोर्नियाच्या सनीवेलमध्ये पीएनजी ज्वेलर्सच्या दुकानात ही जबरी चोरी झाली आहे, ज्याचं सीसीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. चोरी करायला आलेल्या सगळ्या 20 जणांनी त्यांचा चेहरा कापडाने झाकला होता. ज्वेलर शॉपचा दरवाजा तोडून हे सगळे आतमध्ये शिरले.
गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला चोरांनी ताब्यात घेतलं. आतमध्ये गेल्यावर चोर दुकानाच्या वेगवेगळ्या बाजूला गेले आणि ज्वेलरी असलेले डेस्क तोडायला लागले. डेस्क तोडल्यानंतर त्यांनी सोनं आणि हिऱ्याचे दागिने बॅगमध्ये टाकले.
पीएनजी ज्वेलरच्या दुकानातल्या चोरीचं हे सीसीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. फक्त तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत या चोरांनी दुकान लुटलं. मीडिया रिपोर्टनुसार चोरांना दुकानाच्या फ्लोअर लेआऊट बद्दल माहिती होती, त्यांनी चोरी करण्याआधी दुकानाची रेकी केली होती.
- मूळच्या पुण्याच्या असलेल्या पुरुषोत्तम नारायण गाडगीळ म्हणजेच पीएनजी ज्वेलरनी भारत, अमेरिका आणि दुबईमध्ये एकूण 35 दुकानं सुरू केली आहेत. दरम्यान चोरी झालेले काही दागिने पोलिसांना मिळाले आहेत. तसंच एकूण किती रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी पाच चोरांना पकडलं आहे.