कोल्हापूर जिल्हा पोलिस दलातील पोलीस शिपाई आणि चालक पदासाठी १९ ते २८ जून दरम्यान मैदानी चाचणी परीक्षा, तसंच ३ ते ९ जुलै दरम्यान चालक भरती प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये १ हजार ४९६ उमेदवार उत्तीर्ण झाले. या उमेदवारांची लेखी परीक्षा १३ जुलै रोजी स्वामी – विवेकानंद महाविद्यालयात दुपारी तीन वाजता पार पडणार आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
१५४ पोलिस शिपाई आणि ५९ चालक शिपाई जागांसाठी तब्बल १४ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. १९ ते २८ जून दरम्यान पोलिस – कवायत मैदानावर या उमेदवारांची मैदानी चाचणी पार पडली होती.
त्यानंतर ३ ते ९ जुलै दरम्यान चालक भरती प्रक्रिया मेरी वेदर मैदान तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय इथे घेण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी – अत्यंत कडक निकष लावण्यात आले होते. त्यानुसार अतिशय प्रामाणिकपणे ही भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. १४ हजार उमेदवारातून भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर अनेकजण वगळले गेले. शारिरीक चाचणी आणि चालक शिपाई भरती प्रक्रियेत १ हजार ४९६ उमेदवार उत्तीर्ण झाले.
या सर्वांची लेखी परीक्षा १३ जुलै रोजी नागाळा पार्कातील श्री स्वामी विवेकानंद महाविद्यालयात घेतली जाणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. आजपासूनच उमेदवारांना लेखी परीक्षेसाठीचे हॉल तिकीट वितरणास सुरुवात झाली. १३ जुलैला दुपारी तीन वाजता उमेदवारांनी स्वामी विवेकानंद महाविद्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले.