शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी येत्या 23 जुलैला सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने दाखल केलेल्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर यावेळी सुनावणी केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन वर्षात राज्यातील राजकारणात विविध नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यात दोन गट पडले. यातील एक गट हा शिवसेना शिंदे गट आणि दुसरा गट हा शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे गेला. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडल्यामुळे आमदारांचे विभाजन झाले. याप्रकरणी शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवा, अशीही मागणी केली गेली. मात्र यातील एकाही आमदारावर अपात्रतेची कारवाई केली गेली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली. आता याप्रकरणी 23 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे.
राहुल नार्वेकरांचा निर्णय काय?
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा, अशी मागणी केली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं होतं. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील (ठाकरे आणि शिंदे) एकाही आमदारावर अपात्रतेची कारवाई केली नाही. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अपात्रतेबाबतही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी असाच निर्णय दिला.
त्यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नाही म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली. तर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र न केल्याप्रकरणी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?
या दोन्हीही याचिकांवर आता येत्या मंगळवारी 23 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. आता सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबद्दल काय निर्णय लागतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आमदार अपात्र प्रकरण आणि दोन्ही पक्ष नेमके कुणाचे? याबद्दल सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.




