देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील किमान निर्यात मूल्य हटवलं आहे. कांदा निर्यातीवरील किमान 550 डॉलर निर्यात मूल्य हटवलं आहे. मात्र 40% निर्यात शुल्क बाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट केलं आहे. कांदा निर्यातीवरचे किमान शुल्क हटवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना मी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद देतो. कांद्यावरील निर्यात बंदी अगोदरच उठविण्यात आली होती मात्र निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत होते, असं शिंदे म्हणाले.
मी देखील या संदर्भामध्ये केंद्राला विनंती केली होती. किमान निर्यात शुल्क (५५० डॉलर्स प्रति मेट्रिक टन ) हटवण्याच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून कांदा निर्यातीत लक्षणीय वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असंही त्यांनी म्हटलंआहे.