इचलकरंजी –
इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. कृती समितीच्या मताशी मी सहमत असून समितीसोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरविण्यासाठी ठरवाल त्यादिवशी, सांगाल त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष भेटून चर्चा करुन निर्णय घेऊया, असे पत्र आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीला दिले आहे.
इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीने 26 सप्टेंबर रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानावर नागरिकांचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी कृती समितीला पत्र दिले आहे.
या पत्रात इचलकरंजी शहरातील पाणीटंचाई दूर होऊन शहरवासियांना शुध्द व मुबलक पाणी मिळावे यासाठी राज्य शासनाने मंजूर केली सुळकूड पाणी योजना सुरु करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या संदर्भात गठीत केलेल्या इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या मताशी मी सहमत आहे. या कामी समितीसोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवूया. त्यासाठी समिती ठरवेल त्यावेळी आणि सांगेल त्याठिकाणी मी येऊन भेटून चर्चा करण्यास तयार आहे. चर्चेतून योजनेच्या गतीबाबत आपण निर्णय घेऊया, असे म्हटलेआहे.