आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन हे हायब्रिड मॉडेलनेच होणार असल्याचं जाहीर केलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी होणार आहेत. बीसीसीआयने टीम इंडियाला सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानमध्ये पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर बीसीसीआयची मागणी मान्य करत आयसीसीने भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याचं जाहीर करत आडमुठ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
आयसीसीने डोकेदुखी मिटवली
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसह पुढील 3 वर्षांसाठी टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामन्यांबाबत निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात 2024-2027 या साखळीत होणारे सामने हे हायब्रिड पद्धतीनेच होणार, असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामने हे पुढील 3 वर्ष तरी त्रयस्थ ठिकाणीच होतील. हा निर्णय आगामी आयसीसी स्पर्धांसाठीही लागू असणार आहे.
हायब्रिड मॉडेल
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसह इतर स्पर्धांचं आयोजनही हायब्रिड पद्धतीनेच होणार असल्याचं जाहीर केलंय. त्यानुसार महिला वर्ल्ड कप 2025 स्पर्धाही हायब्रिड पद्धतीने खेळवण्यात येईल. या वूमन्स वर्ल्ड कप 2025 च्या यजमानपदाचा मान भारताकडे आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट टीम भारतात येणार नाही. तसेच 2026 साली मेन्स टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपचं आयोजन संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेत करण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तान आपले सामने श्रीलंकेत खेळणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रिड पद्धतीनेच
दरम्यान आयसीसीने पाकिस्तानला आनंदाची बातमी दिली आहे. महिला आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा पाकिस्तानला मिळाला आहे. मात्र ही स्पर्धाही हायब्रिड मॉडेलनेच होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाही तेव्हा आपले सामने त्रयस्थ ठिकाणी खेळेल, हे आत्ताच स्पष्ट झालं आहे.