सांगली – कोल्हापूर महामार्गावरील बाधित दहा गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आता माघार नाही. त्यामुळे मोजणीला आलेल्या अधिकाऱ्यांना पळवून लावा.
जे अधिकारी शेतात खुणा रोवतील, त्या खुणा उपसून टाका. जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. उदगाव (ता. शिरोळ) येथील टोलनाक्यावर सांगली-कोल्हापूर महामार्ग शनिवारी (दि.१५) बेमुदत रोखून धरणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली. (Sangli – Kolhapur Highway)
बाधित शेतकऱ्यांना चौपट भरपाई व उदगाव बायपास मार्ग करावा, या मागण्यांसाठी जैनापूर (ता. शिरोळ) येथे कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी सकाळी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन विचारपूस केली.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, हे आंदोलन फक्त बाधित शेतकऱ्यांचे नाही, तर महापुरामुळे बाधित होणाऱ्या गावांचे आहे. विक्रम पाटील यांनी मागील वर्षभरापासून सुरू केलेला लढा आता शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आक्रमक झाला आहे. त्यांनी तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले असून त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले. तर जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा पेटवून ठेवतील. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, कोथळीचे सरपंच अनमोल करे, जैनापुरच्या सरपंच संगीता कांबळे, ऋषभ पाटील, गौतम इंगळे, विजय खवाटे, भरतेस खवाटे, निळकंठ राजमाने, स्वस्तिक पाटील, दिग्विजय सूर्यवंशी यांच्यासह दहा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.