सोनगे (ता.कागल) येथे बाळूमामांच्या ६ नंबरच्या बग्ग्यातील १२ बकऱ्यांचा कोवळी ज्वारी खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन मृत्यू झाला. तर २५ बकऱ्यांची प्रकृती स्थिर आहे.
महादेव मजगे (चिखलीकर) यांच्या शेतात ही बग्गी मुक्कामला होती. आज सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर सोनगे येथील पशुवैद्यकीय रूग्णालयाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मगदूम व डॉ. रामदास पाटील, सूर्याजी आवळेकर यांनी तातडीने इतर बकऱ्यांवर उपचार सुरू केले.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, संत बाळूमामामांची बकरी सोनगे (ता. कागल) येथील निपाणी – राधानगरी रस्त्याशेजारी असलेल्या महादेव मजगे यांच्या शेतात सेवेकरी नागाप्पा मिरजे हे घेऊन मुक्कामला आले होते. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कळपातील सुमारे ४० बकऱ्यांनी कोवळी ज्वारी खाल्ली होती. विषबाधा होऊन बुधवारी रात्रीच १२ बकऱ्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना सेवेकरी मिरजे यांच्या सकाळी सहा वाजता निदर्शने आढळली. सोनगे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उर्वरित गंभीर असलेल्या बकऱ्यांवर त्वरित उपचार केले.