आषाढी वारीनिमित्ताने पंढरपूरला महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठूरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जात असतात. या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
वारकऱ्यांच्या वाहनांना पथकारातून सूट
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना पथकारातून सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मानाच्या 10 पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर ही सूट देण्यात आली आहे. यासंबंधित शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
या काळात लागू राहील सवलत
त्यानुसार 6 जुलैपासून 29 जुलै पर्यंत वारकऱ्यांच्या वाहनांना ही सवलत लागू राहणार आहेत. त्याचप्रमाणे वारीमार्गावरील वाहतूक व्यवस्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्याचे म्हटले आहे.
येथून घ्यावा पास
सरकारने दिलेल्या सूचनांनुसार, आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या मानाच्या पालख्या, वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना ‘आषाढी एकादशी 2026’ गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा उल्लेख असलेले टोलमाफीचे पास किंवा स्टिकर पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफीसेस यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
टोलमाफीचे पास जाण्या-येण्याच्या दोन्ही प्रवासासाठी वैध असतील. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीतील संबंधित टोल नाक्यांवर ही टोलमाफी लागू राहणार आहे.
एसटी बसेसलाही टोलमाफी
पंढरपूरकडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसेसलाही टोलमाफीची सुविधा देण्यात आली आहे.


