Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्रमान्सून अंदमानमध्ये वेळेआधीच पोहचला, महाराष्ट्रात कधीपर्यंत येणार?

मान्सून अंदमानमध्ये वेळेआधीच पोहचला, महाराष्ट्रात कधीपर्यंत येणार?

मान्सून यंदा वेळेआधीच दाखल होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आला आहे. तसेच निकोबार बेटांवर 13 मे पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन क्षेत्राच्या काही भागात येणार आहे. जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये वेळेच्या चार दिवसांपूर्वी मान्सून येणार असल्याचे म्हटले आहे.

 

2008 नंतर म्हणजेच 18 वर्षांनी मान्सून नियोजित वेळेच्या चार दिवस आधी केरळमध्ये येणार आहे. सध्या मान्सून दक्षिण अंदमान बेटावर आला आहे. 15 मे नंतर त्याची प्रगती वेगाने होणार आहे. त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान बेट व्यापणार आहे. केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख 31 मे आहे. परंतु यंदा 27 मे रोजीच मान्सून पोहचणार आहे. गोव्यामध्ये पाच जून तर महाराष्ट्रातील किनारपट्टी भागांत 6 जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे.

 

भारतीय हवामान विभागाने यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पावसासंदर्भात भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज 2015 वगळता गेल्या 20 वर्षांत बरोबर ठरला. यंदा अल निनो किंवा ला निना याबाबत कोणतीही परिस्थिती उद्भवणार नसल्याचे म्हटले आहे.

 

मान्सून कधी कुठे पोहचणार?

5 जून : गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल.

6 जून : महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे.

10 जून : मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, बिहार.

15 जून : गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश.

20 जून : गुजरात, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली.

25 जून : राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश.

30 जून : राजस्थान, नवी दिल्ली.

हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील तीन-चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून पुढील चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी जळगाव जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -