पंढरपूरला विठ्ठल दर्शनाची आस मनी बाळगून वारीसोबत पायदळ निघालेल्या जिल्ह्यातील युवा वारकऱ्याचा मार्गातच मृत्यू झाला. स्वप्नील विठ्ठल केचे (वय ३०, रा. करजगाव, जि. अमरावती), असे मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्याचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील संत गुलाबराव महाराज संस्थान भक्तिधाम संस्थानची पायदळ दिंडी दरवर्षीच पंढरपूरला जाते. यावर्षीसुद्धा पंचवीस दिवसांपूर्वी जूनच्या सुरवातीला शेकडो महिला, पुरुष वारकऱ्यांचा समावेश असलेली दिंडी पंढरपूरकरिता रवाना झाली होती. त्यामध्ये करजगाव येथील स्वप्नील विठ्ठल केचे या युवा शेतकरी कुटुंबातील वारकऱ्याचाही समावेश होता. हरिनामाचा गरज करीत ही दिंडी धाराशीव जिल्ह्यातील येरमाडा गावापर्यंत पोहोचली होती.
गुरुवारी (ता. २६) पहाटे साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास या दिंडीतील वारकरी हरिनामाचा गजर करीत पुढील मार्गक्रमणासाठी निघाले. त्यात स्वप्नील केचे याचाही समावेश होता. वारीत सहभागी असलेला स्वप्नील तीन दिवसांपासून तापाने फणफणत असतानाही तो वारकऱ्यांसोबत औषधाच्या काही गोळ्या घेऊन पायदळ चालत होता. त्याच्यातील उत्साह कायम होता.
परंतु गुरुवारी पहाटे वारी येरमाडा येथून पुढे मार्गक्रमण करीत असताना स्वप्नीलची प्रकृती बिघडली. त्यात त्याचा वाटेतच मृत्यू झाला. त्यामुळे वारीतील सहभागी दोघांनी स्वप्नील केचे याचा मृतदेह घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले.
डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केल्यावर त्याचे शवविच्छेदन करून सायंकाळी स्वप्नील केचे याचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. इर्विन चौकीतील पोलिसांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून दस्तऐवज पुन्हा धाराशीव जिल्ह्यातील येरमाडा पोलिसांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
वारीत सहभागी दोघे स्वप्नील केचे याचा मृतदेह अमरावतीपर्यंत घेऊन आले. त्या वारकऱ्यांची या घटनेमुळे वारी चुकू नये म्हणून त्यांना परत वारीत सहभागी होण्यासाठी एका वाहनातून पाठविण्याची व्यवस्था केली.