Friday, July 4, 2025
Homeकोल्हापूरमोठ्या विदेशी फॅशन ब्रँडकडून कोल्हापुरी चप्पलेची नक्कल, संभाजीराजे छत्रपती आक्रमक

मोठ्या विदेशी फॅशन ब्रँडकडून कोल्हापुरी चप्पलेची नक्कल, संभाजीराजे छत्रपती आक्रमक

कोल्हापुरी चप्पलची फक्त महाराष्ट्रात नाही, तर जगभरात ओळख आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला कोल्हापुरी चप्पल वापरणारी माणस भेटतील. आता प्राडा नावाच्या विदेशी फॅशन ब्रँडने कोल्हापुरी चप्पलेची हूबेहूब नक्कल करून ती स्वतःच्या नावाने बाजारात आणली आहे. या विरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आवाज उठवला आहे. “प्राडा कंपनीने कोल्हापूरी चप्पलचा उगम, इतिहास, कोल्हापूर भागातील कारागिरांची कौशल्यपूर्ण कला, किंवा भारतीय सांस्कृतिक मूल्यांचा उल्लेखही केलेला नाही. ही गोष्ट केवळ डिझाईन कॉपी नाही, ही कोल्हापूरच्या समृद्ध वारशाची व शेकडो वर्षे हा वारसा जपणाऱ्या कारागिरांची फसवणूक आहे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. “राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या कलेला व कारागिरांना राजाश्रय देऊन कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला भरभराट मिळवून दिली. कोल्हापूरी चप्पल हे केवळ फॅशन स्टेटमेंट नसून, शेकडो वर्षांची कारागिरी, कौशल्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी लिहिलं आहे.

 

“कोल्हापूरी चप्पल आंतरराष्ट्रीय स्तरावर जात असताना त्यासोबत त्या चपलेची मूळ ओळख देखील पोहोचावी, शेकडो वर्षे ही कला ज्यांनी जोपासली, टिकवली, वाढवली व विकसित केली त्या कारागीरांना त्याचा योग्य मोबदला मिळावा, त्या कलाकृती मागील संस्कृती, वारसा व परंपरेची देखील जगाला ओळख व्हावी, यासाठी कोल्हापूरी चप्पलला 2019 साली GI मानांकन मिळाले आहे. या GI मानांकनाच्या अधीन राहून त्याचे सर्व नियम पाळत या कंपनीने कोल्हापुरी चपलेची विक्री केली असती तर कोल्हापुरी जगभरात पोहोचली म्हणून आंनदही व्यक्त केला असता, मात्र सरळसरळ डिझाईन कॉपी करून, चपलेची मूळ ओळख लपवून स्वतःच्या नावाने त्याची विक्री करणे हे कृत्य “सांस्कृतिक अपहार” (Cultural Appropriation) चे मोठे उदाहरण आहे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

 

“सोशल मीडिया वर देखील देशभरातून यावर पडसाद उमटत आहेत, मात्र PRADA कंपनी कडून अद्याप कोणताही प्रतिसाद पाहायला मिळालेला नाही. कंपनीने आपली चूक वेळीच सुधारून कोल्हापुरीची अस्सल ओळख न लपविता कोल्हापुरी चप्पल बाजारात आणले तर आम्ही स्वागतच करू” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. “शेकडो, हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीची, कलाकृतींची अशी नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना योग्य वळण लावण्यासाठी भारत सरकारनेही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच ग्राहक म्हणून आपणही याविरुद्ध आवाज उठवून अशा कंपन्यांना वेळीच त्यांची चूक सुधारविण्यास भाग पाडले पाहिजे” असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -