आशिया कप 2025 स्पर्धेआधी मोठी बातमी समोर आली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी खेळणारा माजी ऑलराउंडर सालिया समन याच्यावर फिक्सिंग प्रकरणी 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. सालिया समन याला आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून अमिराती क्रिकेट बोर्डाच्या (ECB) भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. सप्टेंबर 2023 मध्ये समन याच्यासह एकूण 8 जणांवर आयसीसीच्या संहितेचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. समनवर या 5 वर्षांच्या बंदीच्या कारवाई ही 13 सप्टेंबर 2023 लागू आहे. तेव्हा समनवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. या हिशोबाने समनची जवळपास 2 वर्षांची बंदीची शिक्षा पूर्ण झाली आहे. समनवर 2021 मध्ये झालेल्या अबू धाबी टी10 लीग स्पर्धेदरम्यान हे आरोप करण्यात आले होते. समनने देशातंर्गत क्रिकेटमध्ये 101 फर्स्ट क्लास तर 77 लिस्ट ए सामने खेळले आहेत.
सालिया समन खालील नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी
सालिया समन अनुच्छेद 2.1.1, 2.1.3 आणि 2.1.4 चं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आहे.
अनुच्छेद 2.1.1 मध्ये अबुधाबी टी10 2021 स्पर्धेतील कोणत्याही सामन्यात किंवा सामन्यादरम्यान कोणत्याही टप्प्यात फिक्सिंग करणं, त्या संदर्भात योजना आखणं किंवा सामना प्रभावित करण्यात सहभागी झाल्याचं आढळल्यास कारवाईची तरतूद आहे.
अनुच्छेद 2.1.3 मध्ये दुसऱ्या खेळाडूंना नियमांचं उल्लंघन करण्यासाठी प्रलोभण दाखवल्याचं सिद्ध झाल्यास कारवाई करण्याची तरतूद आहे.
अनुच्छेद 2.1.4 मध्ये खेळाडूंना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या 2.1 चं उल्लंघन करण्यास प्रोत्साहन देणं, मनधरणी करणं तसेच प्रलोभण दिल्याचं सिद्ध झाल्यास कारवाईची तरतूद आहे.
सालिया समनची क्रिकेट कारकीर्द
सालिया समनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रीलंकेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. सालियाने101 फर्स्ट क्लास, 77 लिस्ट ए आणि 47 टी 20 सामने खेळले आहेत.
सालियाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2 शतकं आणि 22 अर्धशतकांसह 3 हजार 662 धावा केल्या. तसेच सालियाने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 1 अर्धशतकासह 898 धावा केल्या. तसेच सालियान लोकप्रिय टी 20 फॉर्मटेमध्ये 673 धावा केल्या.
आयसीसीचा मोठा निर्णय
सालियाने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 231 विकेट्स घेतल्यात. सालियाने या दरम्यान 10 वेळा 4 तर 7 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच सालियाने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 84 तसेच 58 टी 20 विकेट्स मिळवल्या.