लग्नानंतर मूलबाळ होत नसल्याचा राग तसेच चारित्र्यावर संशय घेत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ करत डोक्यात धारदार वस्तूने मारहाण करीत विहिरीत लोटून देत खून केल्याची घटना वडगावपंगू येथे घडली.
पूजा वैभव आहेर (25) असे मृत विवाहितेचे नाव असून, वडगावपंगू येथे गुरुवारी (दि. 21) सकाळी 11.30 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मृत पूजा यांचा भाऊ अभिजित कैलास गवळी (23, रा. कानमंडाळे) यांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पूजा यांचा विवाह वडगावपंगू येथील वैभव मोहनदास आहेर याच्यासमवेत तीन वर्षांपूर्वी झाला होता.
मात्र, 3 ते 4 महिन्यांपासून सासरकडील मंडळींनी पूजाला त्रास देत छळ सुरू केला होता. तिच्या चारित्र्यावर संशय घेत तसेच मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला पूजा कंटाळली होती. गुरुवारी (दि. 21) पती वैभव, सासरे मोहनदास आहेर, सासू राजूबाई उर्फ लताबाई आहेर, केशव आहेर (भाया) व जाऊबाई रूपाली आहेर यांनी संगनमताने पूजाच्या डोक्यात धारदार वस्तूने वार करीत तिला विहिरीत फेकून दिले. यात पूजाचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, हवालदार शेखर रंधे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच मृतदेह मनमाड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, पूजा यांच्या डोक्यावर जखमा असल्याने हा घातपातच असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक कैलास वाघ अधिक तपास करीत आहेत. यावेळी मनमाडचे पोलिस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या आहेत.