फक्त 2 वर्षांची चिमुकली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडून मृत्युमुखी पडल्याची मोठी घटना कोल्हापुरात घडली आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथे 24 फेब्रुवारी रोजी हा दुर्दैवी अपघात घडला होता.
यामध्ये दोन वर्षांची मंचरी ज्ञानेश्वर खोत ही बालिका उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली होती. स्थानिक खासगी रुग्णालयात तिच्यावर तब्बल आठ दिवस उपचार सुरू होते. मात्र, 1 मार्च रोजी रविवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ग्रामदैवत श्री मंगरायासिद्ध यात्रेच्या उत्साहपूर्ण वातावरणात घडलेल्या या घटनेने तेरवाड, लाटवाडी आणि अब्दुललाट गावांमध्ये शोककळा पसरली असून, नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
तेरवाड येथे 23 फेब्रुवारीपासून ग्रामदैवत श्री. मंगरायासिद्ध महाराजांची वार्षिक यात्रा भक्तीभावाने सुरू झाली होती. या निमित्ताने लाटवाडी-अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील एक विवाहित महिला आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीसोबत माहेरी यात्रा साजरी करण्यासाठी पाटील मळ्यात आली होती. घरात नैवेद्याच्या तयारीसाठी सर्वजण व्यस्त होते. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी मंचरीची आई तिला दूधभात भरवत होती. त्यावेळी पाणी आणण्यासाठी आई स्वयंपाकघरात गेली. पण आईच्या पाठीमागे चिमुकली मंचरी देखील धावत गेली आणि तिथे ठेवलेल्या उकळत्या दुधाच्या मोठ्या भांड्यात पडली. भाजलेल्या अवस्थेत तिला प्राथमिक उपचारानंतर सांगलीतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. अत्यंत चिंताजनक प्रकृती असल्याने तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कन्यारत्न
खोत दाम्पत्याच्या आयुष्यातील ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. ज्ञानेश्वर खोत आणि त्यांची पत्नी यांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली होती. तब्बल 20 वर्षे अपत्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या दाम्पत्याला अखेर दोन वर्षांपूर्वी मंचरी हे कन्यारत्न प्राप्त झाले होते. दोन वर्षांतच तिच्या येण्याने घर फुलून गेले होते, मात्र अवघ्या दोन वर्षांच्या आयुष्यात उकळत्या दुधातील अपघाताने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने आई-वडील, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



