मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीतून सुरू झालेला आंदोलनाचा प्रवास आज नव्या वळणावर आला. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सकाळी शिवनेरीवर पोहोचले आणि त्यानंतर मुंबईकडे निघाले. मात्र याचदरम्यान जुन्नरजवळील मराठा आंदोलक सतीश देशमुख यांचा हृदयविकाराने(heart attack) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मुंबईतील जरांगे यांच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्याने आंदोलनात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांनी ८ तासांची परवानगी दिली असून जरांगे यांनी ती मान्य केल्याचे सांगितले होते. परंतु शिवनेरीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले. “न्यायालयाच्या आदेशामुळे परवानगी घ्यावी लागली, पण एका दिवसाची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी दिली पाहिजे,” अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली
जरांगे म्हणाले, “रायगड, शिवनेरी या ठिकाणांहून प्रेरणा मिळते. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळालाच पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेदना समजून घेतल्या पाहिजेत. अटी-शर्ती लादण्याऐवजी आरक्षणाच्या मागणीवर ठोस निर्णय घ्यावा.”आता, जरांगे पाटील आणि आंदोलक मुंबईत पोहोचल्यानंतर प्रशासनाने दिलेली ८ तासांची वेळ पाळली जाणार की नवी रणनीती आखली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



