मालकाकडे तक्रार केल्याच्या रागातून परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या मारहाणीत संतोष गोपाल पांडा (वय 38, रा. शहापूर, मूळ रा. ओडिशा) याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला होता. या प्रकरणी मनोज चंद्रमणी बेहरा, तपस नरोत्तम बेहरा, सिबाराम जंबेश्वर बेहरा (तिघे रा.आझादनगर तारदाळ) या संशयीतांना शहापूर पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयाने सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
संशयित व संतोष हे सर्वजण यंत्रमाग कारखान्यात कामास होते. तपस बेहराची तक्रार केल्याच्या कारणावरुन संतोषशी कारखान्यासमोर भांडण काढले. त्यातून लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने डोक्यात व तोंडावर मारहाण करून संतोषचा खून केला. याबाबतची फिर्याद वसंत सावळेराम शेजवळ (वय 38) यांनी दिली आहे. संतोषला पत्नी व चार वर्षांचा मुलगा आहे. पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी दिवसभर तिची समजूत काढण्यात येत होती. कारखानदार मोठ्या प्रमाणात जमले होते. पो. नि. गंगाधर घावटे यांनी समजूत काढली. त्यानंतर 24 तासानंतर मृतदेह तिच्या ताब्यात दिला व त्याच्या मूळ गावी ओडिशाला तो नेण्यात आला.