मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव मुंबईमध्ये एकवटले आहेत. मुंबईमध्ये भगव वादळ आलं आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. आपल्या मागण्यांसाठी मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आता माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा समाजाची आहे.
आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे, या बैठकीसाठी उपसमितीचे सदस्य दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह इतर सदस्य दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, काही महत्त्वाचे प्रशासकीय अधिकारी देखील विखे पाटील यांच्या बंगल्यावर पोहोचले आहेत. थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे, या बैठकीनंतर सदस्य जरांगे पाटील यांची भेट घेणार का? बैठकीमध्ये नेमके काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके देखील विखे पाटील यांची भेट घेण्यासाठी रॉयल स्टोन बंगल्यावर पोहोचले आहेत.
आज आंदोलनाचा दुसरा दिवस
दरम्यान आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू आहे. सुरुवातीला हाय कोर्टानं या आंदोलनाला आझाद मैदानावर परवानगी नाकारली होती, मात्र त्यानंतर काही अटी शर्तीसह आंदोलनाला एक दिवसाची परवानगी मिळाली होती, त्यानंतर पुन्हा एकदा आंदोलनाची एक दिवसासाठी मुदत वाढवण्यात आली. जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका मराठा समाजानं घेतली आहे.