नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलिस ठाणे हद्दीत येणा-या ग्राम बानोरचंद्र रोड, दावसा शिवार येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीतून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
नरखेड तालुक्यातील पोलीस ठाणे जलालखेडा अंतर्गत बुधवार (ता. २७) रोजी किरकोळ कारणावरून नितेश रामदास पाटील (वय ३२ वर्ष) याला मारहाण करण्यात आली होती. जखमी अवस्थेत नाल्याजवळील रोडच्या बाजुला पडलेला असताना नातेवाईकांनी त्याला जलालखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले होते.
मात्र, प्रकृती गंभीर अवस्थेत असल्याने डॉक्टरांनी सदर जखमी युवकाला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात पाठवले होते. उपचारादरम्यान जखमी नितेश पाटील या युवकाचा मृत्यू झाला. प्रकरणी जलालखेड पोलिसांनी आरोपी अर्पन नरेंद्र बन्सोड (वय २२ वर्ष रा. दावसा ता. नरखेड जि. नागपूर) याच्यावर सिंधु रामदास पाटील यांच्या तक्रारीवरून खूनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.
ही कार्यवाही पोलिस अधीक्षक हर्ष. पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार तूषार चव्हाण तपास करित आहेत. यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विजय माळी व निलेश खरडे, आशिष हिरूळकर, सौंदळे यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार तुषार चव्हाण करत आहेत.