नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला (Nepal Protest) आता हिंसक वळण लागले आहे. इंटरनेट, सोशल मीडियावरील बंदीमुळे नागरिकांचा प्रक्षोभ वाढला असला असं म्हटलं जात असलं तरी वाढता भ्रष्टाचारा, घराणेशाही यामुळेही नेपाळची जनता रस्त्यावर उतरली होती. मात्र आंदोलकांना हाताळताना सरकारने नीट काळजी घेतली नाही, त्यांना रोखण्यासाठी गोळीबार करण्यात आला, त्यामध्ये सोमवारी 19 जण मृत्यूमुखी पडले. यामुळे जनतेच्या संतपाचा भडका उडाला आणि मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर आंदोलकांना रोखणं अश्कय होतं. त्यांचा संताप एवढा वाढला की त्यांनी संसदेसह अनेक महत्वाची ठिकाणं, कार्यालय जाळली. मंत्र्यांना मारहाणही करण्यात आली. एकंदरच सध्या नेपाळ प्रचंड धुमसतं असून हा हिंसाचार कधी आतंबेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारत सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात, बिहार हाय अलर्टवर आहे. नेपाळला लागून असलेल्या बिहारमधील सहा जिल्ह्यांमध्ये पोलिस तसेच सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या जवळच असलेल्या पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल आणि किशनगंज या बिहारमधील सहा जिल्ह्यांची आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्यात आली आहे. बिहार पोलिस मुख्यालयाच्या सूचनेनुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. पर्यटकांच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक लोकांचीही कसून तपासणी केली जात आहे, त्यानंतरच त्यांना येण्या-जाण्याची परवानगी दिली जात आहे.
सीमा चौक्या आणि गावांभोवती गस्त
गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार सीमा सुरक्षा दल (BSF), गुप्तचर विभाग (IB), इतर सुरक्षा संस्था आणि गुप्तचर युनिट्सना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयाने सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेजारच्या जिल्ह्यांशी समन्वय साधून काम करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. पोलिस आणि एसएसबी हे सीमा चौक्या आणि गावांभोवती गस्त घालत आहेत.
पोलिस आणि एएसएसबी कर्मचाऱ्यांना कोणते आदेश ?
नेपाळमध्ये सीमावर्ती भागात घडणाऱ्या घटनांवर गुप्तचर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही अप्रिय परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिस आणि एसएसबी जवानांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांकडून पोलिस मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष हा सतत अहवाल, माहिती घेत आहे. जर नेपाळ सीमावर्ती भागात कोणताही भारतीय अडकला असेल तर त्याला बाहेर काढले जाईल असे पोलिसांनी सांगितलं. नेपाळमधील परिस्थिती सामान्य होईपर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्यात आली आहे. पर्यटकांच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे असे एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) पंकज कुमार दराड यांनी सांगितलं.




