लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी करून मेहुणीच्या मुलानेच एकाला तब्बल चार कोटी सहा लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. गुप्तचर विभागाकडून मला 38 कोटी रुपये मिळणार आहेत, त्यासाठी शुल्क भरायचे आहे, असे सांगून ही फसवणूक केली आहे.
याप्रकरणी पर्वती पोलिसांकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सूर्यकांत दत्तात्रय थोरात (वय 53, रा. दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
शुभम सुनील प्रभाळे (वय 31), सुनील बबनराव प्रभाळे, भाग्यश्री सुनील प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर, धनकवडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार 9 जानेवारी 2020 ते 15 सप्टेंबर 2025 दरम्यानच्या कालावधीत हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी थोरात हे बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आरोपी शुभम हा त्यांच्या मेहुणीचा मुलगा आहे. शुभम याने तो लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेत अधिकारी असल्याची बतावणी थोरात यांच्याकडे केली होती. गुप्तचर यंत्रणेकडून 38 कोटी रुपये मिळणार आहेत. ही रक्कम मिळवण्यासाठी सुरुवातीला काही शुल्क भरावे लागणार आहे, असे त्याने थोरात यांना सांगितले. दरम्यान, आरोपींनी त्यांच्याकडे बतावणी करून वेळोवेळी चार कोटी सहा लाख सात हजार रुपये उकळले.
थोरात यांच्याकडून शुभम याने ऑनलाइन, तसेच रोख स्वरूपात वेळोवेळी रक्कम घेतली. त्यानंतर आरोपींनी त्यांना रक्कम परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
– नंदकुमार गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पर्वती पोलिस ठाणेआरोपी शुभम हा फिर्यादींच्या मेहुणीचा मुलगा आहे. त्याने फिर्यादीला लष्कराच्या गुप्तचर विभागात नोकरी असल्याचे सांगून पैसे मिळणार असल्याची बतावणी करत फी भरण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचे समोर आले आहे.