Saturday, February 21, 2026
Homeमहाराष्ट्र'सख्खे बहीण-भाऊ राज्य विक्रीकर निरीक्षक'; कुठऱ्याच्या मोनिका व हर्षवर्धन पाटीलचे यश, एमपीएससीद्वारे...

‘सख्खे बहीण-भाऊ राज्य विक्रीकर निरीक्षक’; कुठऱ्याच्या मोनिका व हर्षवर्धन पाटीलचे यश, एमपीएससीद्वारे यशाला गवसणी

कुठरे (ता. पाटण) येथील मोनिका पाटील व हर्षवर्धन पाटील या सख्या भावंडांनी एकाच वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत राज्य विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली.

 

बहीण- भावाच्या या यशाचे विभागातून कौतुक हाेत आहे.

 

कुठरेचे शिक्षक दांपत्य रामचंद्र पाटील व मीरा पाटील यांची मोनिका व हर्षवर्धन ही दोन्ही मुले अभ्यासात हुशार. दोघांनीही मोठेपणी अधिकारी बनून कुटुंब व गावाचं नाव दूरवर पोहोचविण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली. त्यासाठी कठोर परिश्रमाच्या जोरावर हे स्वप्न सत्यातही उतरवले. वांग खोऱ्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी हे बहीण – भाऊ आयडॉल ठरले आहेत. मोनिका यांनी बीएस्सी ॲग्रीची पदवी घेतली. त्यानंतर २०२० पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. गेल्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत राज्यात मुलींत दुसरा क्रमांक पटकावला. त्या वेळी पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. मोनिका यांचा गेल्या वर्षी काढणे येथील आयटी इंजिनिअर अनिकेत पाटील यांच्याशी विवाह झाला आहे. त्यांचे सासरे अशोक पाटील हे निवृत्त पोलिस उपनिरीक्षक आहेत.

 

सध्या नाशिक येथे मोनिका यांचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यांनी दिलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (कंबाईन) परीक्षेचाही नुकताच निकाल लागला. त्यात त्या एकट्या नव्हे, तर त्यांच्याबरोबरच परीक्षा दिलेला त्यांचा भाऊ हर्षवर्धन हाही यशस्वी झाला. दोघांनीही विक्रीकर अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. हर्षवर्धनने आरटीओ बनण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून बीटेकची पदवी संपादन केली. तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी तो करत होता. यशवंत सोलाट, धनंजय मते, डॉ. संकल्प देशमुख आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याने सांगितले. मोनिका यांना स्पर्धा परीक्षेचा यापूर्वीचा अनुभव होताच, त्यांनी प्रशिक्षण काळात स्वयंअभ्यासावर लक्ष केंद्रित करून परीक्षेत यश मिळविले.

 

आम्हा भावंडांचे शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होतानाच आनंद आमच्या व आमच्या दोन्ही कुटुंबांसाठी अविस्मरणीय आहे. सासर व माहेरची खंबीर साथ, गुरुजनांचे मार्गदर्शन, यामुळेच हे शक्य झाले.

 

– मोनिका पाटील.

 

स्पर्धा परीक्षेचा मनातील बागुलबुवा प्रथम काढून टाकून परीक्षेला सामोरे जा. माझी बहीण माझ्यासाठी प्रेरणा ठरली. अभ्यासात सातत्य, योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन, वेळेचा सदुपयोग आणि मोबाईलचा आवश्यकतेपुरताच वापर यशासाठी महत्त्वाचा ठरला

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -