Monday, November 24, 2025
Homeक्रीडातिलक वर्माचं चाबूक अर्धशतक, टीम इंडिया आशिया चॅम्पियन, पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा

तिलक वर्माचं चाबूक अर्धशतक, टीम इंडिया आशिया चॅम्पियन, पाकिस्तानचा 5 विकेट्सने धुव्वा

तिलक वर्मा आणि शिवम दुबे या जोडीने केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत आशिया कप 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 2 चेंडूआधी 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाने 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 150 धावा केल्या. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदा, एकूण नवव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. टीम इंडियाच्या या विजयात तिलक वर्मा , शिवम दुबे व्यतिरिक्त संजू सॅमसन याने बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली.

 

टीम इंडियाची विजयी धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली. अभिषेक शर्मा आणि शुबम गिल या जोडीकडून चाहत्यांना स्फोटक सुरुवातीची अपेक्षा होती. गेल्या 3 सामन्यांमध्ये अर्धशतकाची हॅटट्रिक लगावणारा अभिषेक शर्मा पाकिस्तान विरुद्ध अपयशी ठरला. अभिषेक दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 5 रन्सवर आऊट झाला. कॅप्टन सूर्याने पुन्हा निराशा केली. सूर्याने 1 धाव केली. तर उपकर्णधार शुबमन गिल 12 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडियाची 4 ओव्हरनंतर 3 आऊट 20 अशी स्थिती झाली.

 

संजू-तिलकची निर्णायक भागीदारी

त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र अब्रार अहमद याने ही जोडी फोडली. अब्रारने संजूला आऊट करत ही जोडी फोडली. तिलक-संजूने चौथ्या विकेटसाठी 57 रन्सची पार्टनरशीप केली. संजूने 21 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.

 

तिलक-शिवमची निर्णायक भागीदारी

संजूनंतर तिलकची साथ देण्यासाठी शिवम दुबे मैदानात आला. तिलक आणि शिवम जोडीने निर्णायक भागीदारी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 60 रन्सची पार्टनरशीप केली. या जोडीने फटकेबाजी करत टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला. या जोडीला भारताला विजयी करुन नाबाद परतण्याची संधी होती. मात्र शिवम निर्णायक क्षणी आऊट झाला. शिवमने 22 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 2 फोरसह 33 रन्स केल्या.

 

शिवमनंतर रिंकु सिंह मैदानात आला. रिंकु मैदानात आला तेव्हा भारताला 10 धावांची गरज होती. तिलकने यापैकी काही धावा केल्या. तर रिंकुने त्याच्या खेळीतील पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजयी केलं. रिंकु 4 धावांवर नाबाद परतला. तर तिलकने 53 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक आणि नाबाद 69 धावा केल्या. पाकिस्तानसाठी फहीम अश्रफ याने 3 विकेट्स मिळवल्या. तर अब्रार आणि शाहिन आफ्रिदी या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

 

टीम इंडियाच्या फिरकीने पाकिस्तानला गुंडाळलं

त्याआधी कॅप्टन सूर्याने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानसाठी टॉप 3 फलंदाजांनी उल्लेखनीय खेळी केली. त्यामुळे पाकिस्तान 180 पार जाईल, असं वाटत होतं. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या फिरकीपटूंनी कमाल केली आणि पाकिस्तानला 19.1 ओव्हरमध्ये 146 रन्सवर गुंडाळलं.

 

पाकिस्तानसाठी साहिबझादा फरहान याने सर्वाधिक 57 धावा केल्या. फखर झमान याने 46 धावांचं योगदान दिलं. तर सॅम अयुब याने 14 रन्स केल्या. या व्यतिरिक्त एकालाही भारतीय गोलंदाजांसमोर दुहेरी आकडा गाठत आला नाही. टीम इंडियासाठी कुलदीप यादव याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -