Saturday, November 1, 2025
Homeकोल्हापूरशेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे आमिष दाखवून साडेपाच लाखांचा गंडा

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगचे आमिष दाखवून साडेपाच लाखांचा गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी मॅक्स कॅपिटल प्राईम यावर डिमॅट खाते उघडून ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर भामट्यांनी कंपनी कामगाराला ५ लाख ६९ हजारांचा गंडा घातला.हा प्रकार ११ जून ते २३ जुलै या काळात सावित्रीनगर, चिकलठाणा येथे घडला.

 

फिर्यादी प्रवीण प्रकाश शिरसाट (३५, रा. सावित्रीनगर) हे शेंद्रा एमआयडीसीमधील कंपनीत नोकरीला आहेत. ११ जून रोजी सकाळी कंपनीत असताना त्यांना राहुल यादव या भामट्याचा फोन आला. त्याने अल्गो सॉफ्टवेअरद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी मॅक्स कॅपिटल प्राईम यावर डिमॅट खाते उघडायला लावले.

 

आधार, पॅन अपलोड करून प्रवीण यांनी खाते उघडले. सुरुवातीला २५ हजार ६०० रुपये टाकून ट्रेडिंग केली. त्यात रक्कम वाढलेली दिसल्याने त्यांना पुन्हा भामट्याने फॉरेक्स कमोडिटीमध्ये ट्रेंड करण्यासाठी गुंतवणूक वाढविण्यास सांगितले. रक्कम नसल्याचे सांगताच त्याने कंपनीतर्फे मार्जिन रक्कम म्हणून ६३ हजार अॅपमध्ये घेतले. त्यानंतर प्रवीण यांनी पैसे काढायचे असल्याचे सांगताच विशाल जैनने मार्जिन रक्कम भरावी लागेल, असे सांगितले.

 

१९ ते २३ जूनदरम्यान ५९ हजार प्रवीण यांनी भरले. मात्र पुन्हा अॅपमध्ये ५१ हजारांची मार्जिन रक्कम दिसू लागली. प्रवीण यांनी विड्रॉलसाठी विनंती टाकली, तेव्हा त्यांना मेलद्वारे कॅपिटल गेनचे ६८ हजार भरण्यास सांगितले. पुन्हा प्रवीण यांनी पैसे भरले. असे वेगवेगळी कारणे पुढे करून भामटे प्रवीण यांना जाळ्यात ओढत गेले. ७जुलैला ७० हजार भरले. मात्र त्यांना पुन्हा जीएसटी, चार्जेस १ लाख २६ हजार भरण्यास सांगितले. प्रवीण यांनी ९ जुलैला ६० हजार भरले. दोन दिवस वाट पाहिली, पण विड्रॉल न झाल्याने संशय येताच त्यांनी एनसीसीआरपी पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदविली.

 

तक्रारीनंतरही दिले पैसे

 

ऑनलाईन तक्रार केल्यानंतर प्रवीण यांना बरेच कॉल आले. भामट्याने वरिष्ठांशी बोलणे करून देत तुमची रक्कम खरी आहे, कोणतीही फसवणूक नसल्याचे सांगून पुन्हा विश्वास संपादन केला. शेवटचे ३२ हजार भरण्यास सांगितल्याने प्रवीण यांनी ३० हजार भरले. मात्र त्यांना पैसे काही मिळाले नाही. पुन्हा भामट्याने चार्जेसच्या नावाखाली १४ जुलैला ६९ हजार भरण्यास सांगितले. प्रवीण यांनी रक्कम भरल्यानंतर त्यांना पुन्हा ३० मिनिटांत ७० हजार भरा अन्यथा विड्रॉल होणार नाही, असे सांगितल्याने प्रवीण यांनी पैसे भरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -